बुलडाणा : राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा पसारा दिवसेंदिवस वाढताच असुन त्याचा गैरफायदा घेण्याचा गोरखधंदा काही अपप्रवृत्तींनी सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत दारिद्रय रेषेखालील लोकांना बोलेरो सारख्या चारचाकी वाहनांपासुन तर कूकूटपालना पर्यंत अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगत भोळया भाबडया जनतेकडून पैसे उकळणारी टोळी सक्रीय झाली आहे. आज १२ मे रोजी जिल्हा परिषदेत एका महिलेने धाव घेत या योजनेची माहिती विचारली असता ही बाब उघड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अनुदानावर साहित्य मिळत असते याच योजनेच्या धर्तीवर काही अज्ञात लोकांनी अर्ज तयार केले असुन ते गावागावात वाटत आहेत. या अर्जावर जिल्हा परिषद कार्यालय बुलडाणा असे नमुद केले असुन ७५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, क्रुझर, बोलेरो, मालवाहक या वाहनांसोबतच कुक्कुट पालनासाठी मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महिनाभरापुर्वी असा अर्ज घेऊन एका अज्ञात इसम ज्याने आपले नाव भालेराव असे सांगीतले त्याने जलंब- माटरगाव परिसरातील काही लोकांना हे अर्ज दिले आहेत. या अर्जाच्या बदल्यात पाचशे ते सहाशे रूपयांची मागणीही करण्यात आली आहे. रखमाताई भिडे नावाच्या एका महिलेलाही हा अर्ज दिला व जिल्हाधिकारी कार्यालयात या असा सल्ला दिला. सदर महिले या इसमाला पैसे दिले नाहीत मात्र संपूर्ण माहिती दिली ही माहिती असलेला अर्ज साहेबांच्या टेबलवर आहे तुम्ही या असा सल्लाही त्या इसमाने दिला. मात्र या महिलेने जिल्हा परिषद गाठली असता हा अर्जच बनावट असल्याचे उघड झाले. त्या इसमाला कुठलेही पैसे दिले नसल्याने सदर महिलेची फसवणुक झाली नसली तरी असे बनावट अर्ज सर्रासपणे विकून अनेकांना गंडा घातला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदेच्या नावावर फसवणुकीचा धंदा
By admin | Published: May 12, 2014 10:45 PM