ऑनलाइन लोकमत
ओझर टाऊनशिप (नाशिक), दि. 23 - ओझर येथील एका सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून नाशिक येथील सराफी दुकानात गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी चार लाख रुपये घेऊन ते परत न करता त्या सराफी व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी ओझर पोलिसांनी एका महिलेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महिलेस अटक केली आहे. उर्वरित दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. ओझर येथील पंकज तानाजी थोरात (२९) यांचे शिवाजीरोडवर सराफी दुकान असून, सुनील सुभाष अहिरराव रा. ओझर हा त्यांचेकडे नोकर आहे. या नोकराच्या माध्यमातून शीतल चंद्रकांत शहाणे, रा. नाशिकरोड व आकाश मधुकर गायकवाड, रा. ओझर यांनी पंकज थोरात यांचा विश्वास संपादन करून त्यांना सांगितले की, नाशिक येथील सराफ बाजारातील सागर आडगावकर सराफ यांच्याकडे आमचे २०० ग्रॅम सोने गहाण ठेवले असून ते सोडवायचे आहे. त्यासाठी चार लाख रुपये द्या सोने सोडविल्यानंतर तुमच्याकडे ते मोडू (विकू) असे सांगितले. थोरात यांनी विश्वास ठेवून सुनील अहिरराव यांच्याकडे चार लाख रुपये दिले त्यानंतर अहिररावसह शीतल शहाणे व गायकवाड यांनी संगनमत करून थोरात यांना चार लाख रुपये परत न करता त्या पैशाचा अपहार केल्याची तक्रार थोरात यांनी नोंदविल्यावरून वरील तिघांविरुद्ध ओझर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शीतल शहाणे या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पो. निरीक्षक श्रीहरी बहिरट, जमादार ए. बी. बेग, प्रशांत बच्छाव, राजेंद्र देवरे करीत आहेत.