अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यास ३ कोटी ४७ लाख रुपयांची लॉटरी लागल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या लॉटरी संचालकासह या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास टोलवाटोलवी करणार्या सिटी कोतवालीच्या तत्कालीन ठाणेदारांविरुद्ध न्यायालयाने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री तत्कालीन ठाणेदारांसह लॉटरी संचालकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सिटी कोतवाली ठाण्यात पोलीस कर्मचारी संजय व्यंकटराव चक्रनारायण हे कार्यरत असताना त्यांनी १ ऑगस्ट २0१५ रोजी गांधी रोड येथील नितीन मुरलीधर गोयनका याच्या लॉटरी दुकानातून सिक्कीम सरकारची लॉटरी क्र. 0६७९, तिकीट क्र. ४३00२९0 व क्र. १४१७३२३३४२९ लॉटरी विकत घेतली होती. या लॉटरीची सोडत ४ ऑगस्ट २0१५ रोजी निघाल्यानंतर ३ कोटी ४७ लाख रुपयांची लॉटरी संजय चक्रनारायण यांना लागली. ही लॉटरी लागल्यानंतर त्यांना रक्कम देण्यास लॉटरी दुकान मालक गोयनका याने उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे संजय चक्रनारायण यांनी सिक्कीम सरकारच्या मुंबई येथील लॉटरीच्या बड्या अधिकार्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, चक्रनारायण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याच ठाण्यात त्यांची तक्रारीची नोंद घेण्यास तत्कालीन ठाणेदारांनी विरोध दर्शविला. अखेर चक्रनारायण यांनी थेट राष्ट्रीय ग्राहक न्यायालय, दिल्ली येथे या प्रकरणाची तक्रार देऊन अकोला न्यायालयातही धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यशदीप मेश्राम यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज चालल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने संजय चक्रनारायण यांचीफसवणूक झाल्याचे नमूद करून तत्कालीन ठाणेदार, अकोल्यातील लॉटरी दुकानाचा मालकासह, लॉटरी सॉफ्टवेअर, लॉटरीचे संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून त्यांच्यावर ४२0,४0६,३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यांच्यावर झाले गुन्हेकोतवाली ठाण्यात सिटी कोतवालीचे तत्कालीन ठाणेदार, लेबीन रिटेलर, क्लॉमेक्स डिपार्टमेंट पॅन इंडिया, नेटवर्क लि. (रा. १३५, कॉन्टीनेंटल बिल्डिंग, डॉ. अँनीबेझंट मार्ग, वरळी मुंबई), डायरेक्टर ऑफ स्टेट लॉटरी सिक्कीम सरकार, गंगटोक, कॅवीन रिटेलर, क्लेम डिपार्टमेंट पॅन इंडिया नेटवर्क लि. (रा. पश्चिम मुंबई), भारत सॉफ्टवेअर आयएनसी, नागपूर (रा. ४९३, सुपीत अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलनी, नागपूर) व नितीन मुरलीधर गोयनका यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणेदारांसह लॉटरी संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे
By admin | Published: July 06, 2016 1:44 AM