पुणे : परदेशी सहल घडवून आणण्याच्या नावावर ग्राहकांची १९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे़ मयूर अशोक पाटील (वय ३५, रा़ निलाकुंज अपार्टमेंट, प्रभात रोड) असे त्याचे नाव आहे़ न्यायालयाने अधिक तपासासाठी २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ मयूर पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत़ याप्रकरणी यशपाल धनपाल देसाई (वय ४९, रा. समर्थनगर, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. देसाई आणि त्यांच्या परिवारातील ५ जणांचे लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, इटली येथे जाण्यासाठी वंडर हॉलिडेजकडे १८ रात्री आणि १९ दिवसांचे बुकिंग केले होते. हॉटेल, व्हिसा, विमानाची तिकिटे यांसह परदेशातील प्रवास यासाठी पाटील याने त्यांना २१ ते २४ मे या कालावधीत सिंहगड रस्त्यावरील आरबीएल बँकेत १९ लाख २० हजार रुपये भरायला सांगितले़ या प्रकरणी पोलिसांनी पाटील याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्या वेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, त्याने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली़ मयूर पाटील याच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)।देसार्इंची परदेश वारी हुकलीदेसाई यांचे प्रवासाला जाण्याचे दिवस जवळ आले, तरी पाटीलने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे देसाई यांना परदेशात पर्यटनाला जाता आले नाही.
परदेश वारीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Published: June 27, 2016 1:35 AM