ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या नावावर विद्यार्थिंनींची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोघांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरिता कुंभारे रा. उरुवेला कॉलनी आणि नवीन कुमार रा. बंगलुरू असे आरोपीचे नाव आहे. सरिताने बुटीबोरी येथील दीक्षा इवनातेसह जवळपास अडीचशे विद्यार्थिनींना बंगळुरू येथील इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दिले. तिने विद्यार्थिनींना केवळ दहा हजार प्रवेश शुल्क लागणार असून, शिष्यवृत्तीसुद्धा मिळणार असल्याचे सांगितले. शिष्यवृत्तीतूनच त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण केला जाणार असल्याचेही सांगितले. बंगळुरू येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतात. केवळ दहा हजार रुपयात प्रवेश मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सरिताशी संपर्क साधला.सरिताने प्रत्येकाकडून प्रवेशाच्या नावावर दहा हजार रुपये घेतले. प्रवेश मिळण्याच्या विश्वासाने दीक्षासह इतर विद्यार्थी बंगरुरू येथील इन्स्टिट्यूला गेले. तिथे नवीनकुमार याने ८० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रुपये जमा न केल्याने परीक्षेत बसता येणार नाही, अशी धमकी दिली. विद्यार्थिनींनी जेव्हा शिष्यवृत्तीतून इतर खर्च वसूल केला जाणार असल्याची आठवण करून दिली, तेव्हा आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. सरिताने विद्यार्थिनींकडून शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्याच्या नावावर प्रत्येकाकडून ५०० रुपये घेतले होते. त्यामुळे विद्यार्थी सरिता व नवीनकुमारवर दबाव टाकू लागले. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना पैसे जमा करण्यासाठी व्यक्तीगत कर्ज घेण्यास सांगितले. त्यामुळे आपण फसवल्या गेल्याचे लक्षात आल्याने विद्यार्थ्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केला.- लाखो रुपयांची फसवणूकआरोपींनी नर्सिंग प्रवेशाच्या नावावर जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांकडून रुपये घेतल्याची माहिती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून दहा-दहा हजार रुपये घेतले गेले. त्यामुळे ही रक्कम प्रचंड मोठी आहे. विद्यार्थी आणि आरोपींची विचारपूस केल्यावरच खरी माहिती उघडकीस येईल.
नर्सिंग अभ्यासक्रमाच्या नावावर फसवणूक
By admin | Published: February 09, 2017 8:33 PM