Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जरांगे पाटील यांना ज्युस पाजला आणि त्यांचे उपोषण मागे घेतलं. राज्यात उभं राहिलेलं एक मोठं आंदोलन मागे घेण्यात यशस्वी ठरल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं जात असताना मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे.
"ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही. आज मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांची फसवणूक आहे. सरकारचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसविण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरे काही नाही," असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
"ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण"
सरकारला लक्ष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, "सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र आजची अधिसूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने टाकलेलं पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवाबनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नये. ही बनवा बनवी ओबीसी आणि मराठा समाज सहन करणार नाही," असा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे.