ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - मंत्र्यांशी सलगी असल्याची बतावणी करून एका आरोपीने दोघांना काम करण्याचे आमिष दाखवून २६ हजार रुपये उकळले. भूषण मधूकर देशमुख (रा. नरेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भूषण देशमुख हा अनेकाकडे वेगवेगळ्या थापा मारतो. आपली मंत्रालयात अनेकांशी ओळखी आहे, असे सांगून त्याने उंटखान्यातील सहर्ष लालजी जांभूळे (वय २७) यांना टीव्ही अॅड कंपनीचे रजिस्ट्रेशन करून देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात आरोपी देशमुखने जांभुळेकडून ४ जानेवारीला ३६ हजार रुपये घेतले. त्यानंतर जांभुळेचा मित्र मनिष रेवतकर याला कोर्टाचे काम करून देतो, असे सांगून त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने दोघांचेही काम करून दिले नाही आणि टाळाटाळ करू लागला. जांभुळेने तगादा लावल्यानंतर त्याला २० हजार रुपये परत केले. त्यांची उर्वरित १६ हजार आणि रेवतकरचे १० हजार रुपये मात्र परत केले नाही. त्यामुळे या दोघांनी इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर देशमुखविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.