ठाणे : एका नामांकित रसायनाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा ई-मेल हॅक करून बनावट मेलद्वारे कंपनीची ३५ लाख ५४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार बॉटेनिकल रिसोर्सेस आॅस्ट्रेलिया प्रा.लि. या ठाण्याच्या कंपनीत घडला. या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागात बॉटेनिकल रिसोर्सेस, आॅस्ट्रेलिया या खासगी रसायनाच्या कंपनीची शाखा आहे. याच कंपनीचा ई-मेल एका भामट्याने हॅक करून कंपनीला आलेल्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील मेलची माहिती घेतली. २१ ते २३ फेब्रुवारी रोजी दरम्यान या कंपनीला आॅस्ट्रेलियातील एका बँक खात्यावर पैसे भरण्याचा मेल आला होता. याच मेलची माहिती काढून पुन्हा तसाच बनावट मेल या भामट्याने तयार केला. त्याद्वारे केदार गोखले यांच्या या कंपनीला आॅस्ट्रेलियाऐवजी लंडनच्या बँक खात्यात ५२ हजार ९१२ यूएस डॉलर (भारतीय चलनामध्ये ३५ लाख ५४ हजार २९४) भरणा करण्यास सांगण्यात आले. हा मेल खरा असल्याचा समज झाल्याने कंपनीने मेलच्या मजकुराप्रमाणे ही रक्कम लंडन येथील बँक खात्यात भरणा केली. प्रत्यक्षात असा काही मेल पाठवण्यात आलाच नसल्याचे समजल्यानंतर कंपनीच्या वतीने गोखले यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी आयटी कायद्यांतर्गत २ मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)कंपनीचा किंवा वैयक्तिक ई-मेल हॅक करून अशा प्रकारे फसवणुकीचे असे प्रकार होत असल्यामुळे आपल्याकडे आलेल्या मेलची आणि आर्थिक व्यवहारांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. या प्रकरणातील हॅकर हे आॅस्ट्रेलिया, लंडन किंवा ठाण्यातील आहेत काय, याची चौकशी सुरू आहे.- डी.डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली, ठाणे
बनावट ई-मेल पाठवून फसवणूक
By admin | Published: March 04, 2017 5:38 AM