हितेन नाईक / पालघरबुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील १०३ आश्रमशाळांची कसून तपासणी करण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १०३ समित्या बनविण्यात आल्या असून, मंगळवारपासून ही तपासणी सुरू होणार आहे. ती २२ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, तिचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. काही गैरप्रकार आढळल्यास त्यावर आदिवासी विकास आणि महिला व बालकल्याण विभाग तत्काळ कारवाई करणार आहे.आदर्श आश्रमशाळा तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने तयार केलेल्या आचार संहितेतील सर्व योजना व नियम हे कागदावरच राहिल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांचे शोषण सातत्याने होत असून, त्यासंदर्भातील १३ अहवाल मागील पाच वर्षांपासून पडूनअसूनही त्याबाबत कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतलेला नाही. त्यामुळेच विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महिला अधीक्षिकांच्या रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात यासाठी सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे अनेक वर्षांपासून आवाज उठवीत असल्या तरी त्यांचा पक्ष आज सत्तेत असल्यानंतरही त्या त्याबाबत काहीही करू शकलेल्या नाहीत. आदिवासींचे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी विकास मंत्री तथापालक मंत्री असलेले विष्णू सवरा हेदेखील याबाबत अपयशी ठरले आहेत.
आश्रमशाळांची होणार तपासणी
By admin | Published: November 14, 2016 5:38 AM