ठाणे : येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. या खासगी वित्त कंपनीवर टाकलेल्या दरोड्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी १५ आरोपींविरुद्ध ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल २७५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. अमोल कार्ले या कर्मचाऱ्यासह ठाणे आणि नाशिकच्या १५ जणांच्या टोळक्याने तब्बल ११ कोटी ८० लाखांची लूट केली होती. ‘चेकमेट’च्या कलेक्शन सेंटरमध्ये २८ जून २०१६ला पहाटे २.३० ते ३.३०च्या सुमारास हा लुटीचा प्रकार घडला. तोंडावर रुमाल लावून आलेल्या दरोडेखोरांपैकी काहींनी गेटवरील सुरक्षारक्षक रामचंद्र कोरे यांना त्यांच्या पोटाला चाकू लावून बाहेर काढले. बेसमेंटमधील सेंटरजवळील आॅटोमॅटीक लॉकच्या दरवाजाजवळ ते आले. आपलेच सुरक्षारक्षक आल्याचे पाहून गनमॅन प्रकाश पवार यांनी मुख्य दरवाजा उघडला, परंतु त्याच्या मागून आलेल्या या टोळीने आत रोकड मोजणाऱ्या १७ कामगारांना ठार मारण्याची धमकी देऊन कचऱ्याच्या बॅरलमध्ये सुमारे ११ कोटी ८० लाख रुपये भरले आणि बॅरल घेऊन ते पसार झाले. दरोडा पडला, त्या वेळी अमोल हा कंपनीतील १७ कर्मचाऱ्यांमध्येच राहून दरोड्यासाठी पहाटे येणाऱ्या टोळीला आतील बित्तमंबातमी देत होता. दरोड्यानंंतरही तो आपल्या सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात होता. चौकशीच्या दरम्यान प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे दिल्याने तो पोलिसांच्या जाळ््यात अडकला. बाजूच्याच इमारतीमधील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्येही तो नोटांचे बंडल असलेले बॅरल घेऊन जात असल्याचे दिसले. त्याला दरोड्याच्या काही तास आधी दरोडेखोरांपैकी एकाने एसएमएस पाठवला होता. त्याचा सिग्नल मिळाल्यानंतरच टोळी आत शिरली.या प्रकरणी १५ जणांना अटक करून १० कोटी आठ लाख ५५ हजार ६१५ इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तिसऱ्याच दिवशी गुन्ह्याची उकल करण्यात ठाणे पोलिसांना यश आले.नाशिक, कर्नाटक आणि मुंबई आदी ठिकाणी वेगवेगळी पथके आरोपींच्या शोधासाठी पाठविली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे ठाणे, वागळे इस्टेट, खंडणी विरोधी पथक, मध्यवर्ती पथक, सोनसाखळी चोरी विरोधी पथक आदीं पथकांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त पराग मणेरे आदींच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा मोठ्या कौशल्याने तपास केला. आतापर्यंत ९२ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून न्या. पी.एस. गुप्ता यांच्या न्यायालयात२२ सप्टेंबर रोजी याप्रकरणी २७५ पानांचे आरोपपत्र दाखल केले, तर मंगळवारी सर्व १५ जणांविरुद्ध आरोप निश्चितीचे दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
‘चेकमेट’ प्रकरणात आरोपपत्र दाखल
By admin | Published: September 28, 2016 1:35 AM