समीर कर्णुक,
मुंबई- चेंबूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून अनेक पोलीस जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दुरुस्ती करण्यात यावी म्हणून वारंवार बांधकाम खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु याबाबत काहीच उपाय योजना करण्यात येत नसल्याने एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.चेंबूरच्या मध्यभागी असलेले चेंबूर पोलीस ठाणे ३० ते ४० वर्ष जुने आहे. पोलीस ठाण्याची इमारत दयनीय अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्यात पोलिसांना बसण्यासाठी जागा नसल्याने पोलीस स्व:खर्चातून काही प्रमाणात येथील डागडुजी करत आहेत. मात्र स्टेशन हाऊसमधील स्लॅब कोसळण्याचे प्रमाण वाढत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच येथे स्लॅब कोसळून एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची दूर्देवी घटना घडली होती. मात्र तरिही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही.स्टेशन हाऊस आणि संगणक कक्षामध्ये अधिकारी आणि तक्रार देण्यासाठी आलेले नागरिक बसलेले असतात. याठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकारी वर्गाने पोलीस ठाण्याची पाहणी केली. मात्र अद्यापही काहीच उपाय योजना करण्यात आली नसल्याचे चित्र आहे.