अण्णा खोत- मालगाव मिरजपूर्व भागात दूध संकलन करणाऱ्या टोळ्यांनी भेसळीसाठी विषारी घातक रसायनाची (कृत्रिम दूध) भेसळ सुरु केली आहे. मिरजपूर्व भागात दूध व्यवसाय तेजीत आहे. जनावरांच्याच्या खाद्याचे वाढते दर, त्या तुलनेत दुधाला न मिळणारा दर शेतकऱ्यांना पडवणारा नाही. मात्र दूध संकलन करणाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने केलेल्या दूध खरेदीत अधिक नफा मिळत असतानाही, त्यांनी दुधात भेसळ सुरु केली आहे. दुधाची वाढ व फॅट लागण्यासाठी आरोग्याला घातक असणाऱ्या लॅक्टो, नवसागर या रसायनाबरोबरच स्टार्च पावडर, युरियापासून तयार केलेले दूधसदृश द्रावण थेट दुधात भेसळ केले जात आहे. लॅक्टो हे रसायन फॅट वाढीसाठी वापरले जात असले तरी, यामुळे हृदयावर परिणाम होतो, वंध्यत्व व अंगफुगीवर परिणाम होतो. दूध टिकण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. युरियाच्या मिश्रणाने किडनी निकामी होणे, अंधत्व येणे व विषबाधा होते, तर द्रव्याला पांढरा रंग येण्यासाठी वापरली जाणारी स्टार्च पावडर शरीरावर गंभीर परिणामकारक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मिरज पूर्व भागात संकलन होणारे दूध शहरी भागातील खासगी दूध केंद्रांना वितरित केले जाते. यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून, कारवाईची मागणी आहे. कारवाई थंडावली ! -अन्न सुरक्षा कायद्याच्या निर्मितीनंतर दुधातील भेसळ शोधण्याची व कारवाईची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडून अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाला दुधातील भेसळ करणारे व भेसळ कशी होते याबाबत माहिती व अनुभव आहे. मात्र कारवाईचे अधिकार काढून घेतल्याने दुधातील भेसळीविरुध्दची कारवाई वर्षभर थंडावली आहे. यामुळेच दूध भेसळ करणाऱ्यांचे फावले आहे.
मिरज पूर्व भागात दुधात रसायनाची भेसळ
By admin | Published: September 06, 2015 10:51 PM