सिकंदर अनवारे,
दासगांव- महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहून नेणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी महाड तालुक्यातील ओवळे या गावाजवळ खाडीमध्ये सोडले जात आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर फेस येत असून, या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वास येत असल्याने संबंधित परिसरात याचा त्रास जाणवत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण मंडळाचे अधिकारी मात्र हे पाणी सीओडी योग्य असल्याचा दावा करीत आहेत.महाड तालुक्यातील नागरिक औद्योगिक वसाहतीच्या घातक रसायनयुक्त सांडपाण्याला तसेच वायूप्रदूषणाला कंटाळले आहेत. मात्र अनेक वर्षे नागरिक याचा त्रास सहन करीत आहेत. वारंवार अनेक कारखान्यांतून घातक सांडपाणी थेट गटारात तसेच खुल्या जागेत सोडण्यात येते. महाड औद्योगिक वसाहतीमधून आंबेत या खाडीमध्ये सांडपाणी सोडायचे आहे. मात्र कारखाने सुरू झाल्यापासून आजपर्यंत आंबेत खाडीत पाणी सोडण्यात आलेच नाही. जवळच असलेल्या ओवळे गावाजवळच सोडण्यात येत आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याला फेस येत आहे व तालुक्यातील खाडीपट्ट्यातील परिसरात रसायनांची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. चार-पाच वर्षांत महाड प्रदूषण मंडळाने अनेक कारखान्यांवर मोठमोठी कारवाई केल्याने बऱ्याच प्रमाणात खाडी प्रदूषणाला आळा बसला होता. मात्र गेल्या १५ दिवसांपासून याच खाडीत महाड औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याला ज्या ठिकाणी सोडण्यात येते, त्या ठिकाणी फेसाळत असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वायूच्या वासाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हजारो नागरिकांचे जीवनमान पुन्हा धोक्यात आले आहे.उधाणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून भातशेती व कडधान्याचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी घातक रसायन सांडपाण्याला कंटाळूून शेकडो एकर जमीन ओसाड सोडली आहे. तसेच या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील फटका बसला असून, अनेक विहिरी या पाण्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाड प्रदूषण मंडळाला या परिसरातील कारखान्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार नसून, फक्त कागदोपत्री नोटिसा देण्याचेच अधिकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील कारखान्यातून अॅसिडयुक्त सांडपाणी थेट गटारात सोडले जाते. २०१४ ते २०१६ या कालावधीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वॉर्निंग तसेच कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. मात्र अद्यापही हे कारखाने बंदही केले नाहीत व यांनी अॅसिडचे पाणी गटारात सोडण्याचे उद्योग अद्याप बंद केलेले नाही. >मोकळ्या भूखंडावर सांडपाण्याचा डोह>प्लॉट नं. बी २३ हा खुला प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घातक रसायनयुक्त सांडपाणी साचलेले आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे कानाडोळा करीत आहे. यामुळे वर्षाचे बाराही महिने हा रिकामा प्लॉट सांडपाण्याने भरलेलाच असतो. रिकाम्या प्लॉटशेजारी अॅस्टेक लाइफ सायन्स आणि टायर कंपनी आहे. सदरचे पाणी कोणाचे, याबाबत कोणताच कारखाना जबाबदारी घेत नाही. तर या डोहातील साचलेल्या पाण्याचे परीक्षण करून आरोपींना पकडण्याचे कामही प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत नाही.>सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून ओवळे गावाच्या हद्दीत सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे परिसरात जीव गुदमरून टाकणारी दुर्गंधी पसरते. वारंवार सांडपाण्याची तपासणी केली जाते. येणारे अहवालही हे नियमाप्रमाणे आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्यात तरंगणाऱ्या फेसाबाबत अधिक तपास करावा लागले.- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ,