दासगाव/महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हमधून शनिवारी रात्रीच्या सुमारास रासायनिक सांडपाण्याची गळती झाली आहे. दासगाव खाडीपट्ट्यातील तुडील आणि कुंबळे गावच्या हद्दीत ही गळती झाली आहे.महाडच्या औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी पाइपलाइनद्वारे सावित्री खाडीच्या पात्रात सोडले जाते. रासायनिक पाणी या पाइपमधून वाहत असताना त्यामध्ये गॅस निर्माण होतो. हा गॅस बाहेर जाण्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व्ह ठेवण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी खाडीमध्ये मोठी भरती असल्याने भरतीच्या पाण्याचा दाब सांडपाणी सोडणाऱ्या पाइपच्या तोंडावर वाढल्याने पाइपमध्ये अतिरिक्त दाब तयार झाला. यामुळे लगतच्या दोन व्हॉल्व्हमधून हा दाब बाहेर पडताना सोबत पाइपमधील सांडपाणीदेखील बाहेर पडले, अशी माहिती औद्योगिक वसाहतीच्या सूत्रांनी दिली.गळतीची ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये कुंबळे येथील स्मशानभूमीशेजारून रासायनिक सांडपाणी थेट खाडीत गेले, तर तुडील गाव हद्दीत साइड पट्टीत पाणी शिरले. यामुळे कोणाचेही विशेष नुकसान झाले नाही. या गळती प्रकरणी ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहतीत तक्रार दिल्यानंतर पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. रविवारी दुपारी या गळतीच्या ठिकाणी दुरुस्तीेचे काम करण्यात आले. मात्र, शंकर सकपाळ व अब्दुल्ला शेख या शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर हे सांडपाणी पसरल्याने त्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या वाहिन्यांची गळती काढण्याचे काम एमआयडीसीकडून तत्काळ हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)
रासायनिक सांडपाण्याच्या पाइपलाइनला गळती
By admin | Published: April 03, 2017 3:48 AM