सांगली : येथील नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे ‘एस. के. वैद्य सांगली बुद्धिबळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बापट बाल शिक्षण मंदिरमध्ये दि. २७ एप्रिल ते ३१ मे दरम्यान हा महोत्सव होणार आहे. विविध वयोगटांच्या अकरा स्पर्धा या महोत्सवात होतील. या स्पर्धेत साडेपाच लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यंदा स्पर्धा वातानुकूलित सभागृहामध्ये होणार आहेत. बाबूकाका शिरगावकर व मीनाताई शिरगावकर यांच्या नावे होणारी आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धा या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी व राजेंद्र शिदोरे (दोघे पुणे) आणि दीपक वायचळ (सांगली) पंच म्हणून काम पाहणार आहेत. महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धा व त्यांचे वेळापत्रक असे : बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग २७ ते ३० एप्रिल, तम्मण्णाचार्य पडसलगीकर स्मृती आठ वर्षांखालील स्पर्धा १ ते ४ मे, सीताबाई भिडे स्मृती चौदा वर्षांखालील स्पर्धा १ ते ४ मे, लीलाताई देशपांडे स्मृती दहा वर्षांखालील स्पर्धा ५ ते ७ मे, श्रीमंत दादासाहेब गाडगीळ स्मृती सोळा वर्षांखालील स्पर्धा ५ ते ७ मे, आबासाहेब गानू स्मृती बारा वर्षांखालील स्पर्धा ८ ते १० मे, काकासाहेब टिकेकर स्मृती पंचवीस वर्षांखालील स्पर्धा ८ ते १० मे, पंडित रघुनंदन शर्मा स्मृती पन्नास वर्षांखालील स्पर्धा ९ ते १० मे, बाबूकाका शिरगावकर स्मृती फिडे मानांकन खुल्या स्पर्धा ११ ते १७ मे, नारायणराव जोशी खुल्या ब्लिटझ् स्पर्धा १२ ते १६ मे, मीनाताई शिरगावकर स्मृती फिडे मानांकन खुल्या महिला स्पर्धा १८ ते २३ मे, बाळासाहेब लागू स्मृती रॅपिड स्पर्धा २४ ते २५ मे, कोचस कोचिंग कॅम्प चेस इन स्कूल ३० ते ३१ मे. (प्रतिनिधी)बुद्धिबळ भवन पूर्ण होणार का ?बुद्धिबळ भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या निधनानंतर नूतन बुद्धिबळ मंडळाने त्यांचे कार्य व स्पर्धा अखंडित सुरू ठेवल्या आहेत. सांगलीत बुद्धिबळ भवन व्हावे, असे पडसलगीकर यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी राजाभाऊ शिरगावकर, चिदंबर कोटीभास्कर, चिंतामणी लिमये, प्राचार्य रमेश चराटे, दीपक वायचळ, उल्हास माळी, स्मिता केळकर, सीमा कठमाळे, प्रमोद चौगुले, रवींद्र कानिटकर, कुमार माने, अतुल इनामदार व त्यांचे साथीदार पाठपुरावा करीत आहेत.
सांगलीत सोमवारपासून बुद्धिबळ महोत्सव
By admin | Published: April 22, 2015 11:35 PM