सध्या चिमणी अन् कावळ्याची जुनी गोष्ट पुन्हा एकदा नव्या रूपात सोशल मीडियावर व्हायरल झालीय. पिलाला खाऊ-पिऊ घालणारी चिऊताई घरट्याचं दार उघडत नाही म्हणून कंटाळलेला कावळा स्वत:चं नवं घर बांधतो, असं या नव्या गोष्टीत दाखविलेलं असलं तरी घर बांधेपर्यंत प्रत्यक्षात काय घडतं, याचा शोध घेतला. तेव्हा हाती आलेली ही सुरस कथा...सध्याच्या आधुनिक जमान्यातली चिऊताई आपल्या ‘बेबी’ला ‘फ्रेश बाथ’ अन् ‘लाईट ब्रेक फास्ट’ करण्यात ‘व्हेरी-व्हेरी बिझी’ बनल्यानं कावळा इरिटेड झाला, पोट भरण्यासाठी त्यानं फांदीवरून झेप घेतली. खायला काही तरी मिळतं का, हे पाहण्यासाठी तो थेट मुंबईत पोहोचला. ‘कृष्णकुंज’च्या छतावर बसून आतील दृश्यं टिपू लागला.. पण आतमध्ये कसलीच हालचाल दिसत नव्हती. सर्वत्र सामसूम होती. सन्नाटा होता. नाही म्हणायला एखादी फोनची रिंग वाजली की बंगल्यात उत्साह निर्माण व्हायचा, ‘आलाऽऽ आलाऽऽ फोन आला.. युतीच्या प्रस्तावाचा कुणाकडून तरी फोन आला!’ अशा आनंदानं गुणगुण व्हायची. पण फोन उचलताच तिकडचा कार्यकर्ता म्हणे गडबडून जायचा, ‘सॉरीऽऽ साहेब... नेहमीच्या सवयीनं चुकून तुम्हालाच कॉल लागला. आम्ही ‘वर्षा’वर पंतांना नाही तर ‘मातोश्री’वर उद्धोजींना फोन लावत होतो. प्रवेशाची तारीख फिक्स करायचीय नां.’ ..अन् खडाऽऽक. पुन्हा नीरव शांतता.कधीकाळी गजबजून गेलेल्या या परिसरात आता काहीच खायला मिळणार नाही, हे लक्षात आल्यानं कावळा तिथून उडाला. नाशकाकडं निघाला. वाटेत ‘कारागृह’ लागलं. इथं तरी काही मिळेल, या आशेनं तो खाली उतरला. ‘आत’मध्ये एक पांढरा दाढीवाला नेता गळ्याभोवती मफलर गुंडाळून हात चोळत बसला होता. या नेत्याचा चेहरा ओळखीचा वाटला, पण दाढी अन् कानटोपीमुळं ओळखू येत नव्हता. कावळ्यानं सहानुभूतीनं ‘कावऽऽ कावऽऽ’ केलं. तेव्हा हातात गीता घेऊन विश्वातल्या सत्याचं सार सांगण्यात नेता गढून गेला, ‘तुम यहॉँ क्या लाये थे, जो खो दिया! जो किसी और का था, वो तेरा हो गया था... लेकीन जो अब तक तेरा था, वो किसी और का हो गया!’ उपाशीपोटी अध्यात्माचा मारा न पचल्यानं कावळा तेथूनही उडाला. खान्देशाच्या वाटेत ‘मुक्ताई’ बंगला लागला. ‘नाथाभाऊ’कडचा पाहुणा म्हणे कधीच उपाशीपोटी परत जात नाही, हे ऐकून थांबला. बाहेर तुरळक कार्यकर्त्यांची गर्दी. ‘खुर्ची परत मिळेल का?’ याऐवजी आता ‘समितीचा ससेमिरा कधी थांबणार?’ या प्रश्नावर कार्यकर्ते कुजबुजू लागलेले. अशातच पंतांनी ऐनवेळी रिजेक्ट केलेल्या बदली लिस्टमधले काही अधिकारी बाहेर हेलपाटे मारू लागलेले. त्यांचेही चेहरे काळवंडलेले. हे सारं पाहून कावळा दचकला. क्षणार्धात वास्तवाचं भान आलं. तो तिथून उडाला. थेट ‘चिऊताई’च्या घरट्यासमोर आला. त्यानं टकऽऽटक केलं. आतून आवाज आला, ‘माझ्या बेबीचं वॉश-बिश झालंय. टम्मीही भरलीय. थांब हंऽऽ आलेच. दार उघडते!’ तेंव्हा कावळ्यानं बाहेरूनच निक्षून सांगितलं, ‘चिऊताईऽऽ चिऊताईऽऽ दार उघडू नकोस. माझ्यापेक्षाही केविलवाणी अवस्था बाहेर अनेकांची झालीय. मात्र, त्यांच्यापेक्षाही मी नक्कीच सुखी; कारण जेवढं पदरात पडेल, तेवढ्यावरच मी समाधान मानतोय. चलऽऽ बाय.. बाय..!’- सचिन जवळकोटे
चिऊताई.. दार उघडू नकोस!
By admin | Published: January 21, 2017 12:31 AM