छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षमयी जिवनावर आधारित चित्रपट छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. पहिल्या पाच दिवसांत १६५ कोटींची कमाई केली आहे. लवकरच तो २०० कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मातीशी संबंधीत असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी या संधीचे सोने करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला विजय मिळाला त्या महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांनी एका छोटेखानी थिएटरमध्ये महिलांना छावा चित्रपट मोफत पाहण्याची सोय केली आहे.
अहिल्यानगरच्या सिनेलाईफ मिनीप्लेक्समध्ये हा चित्रपट महिलांना मोफत पाहता येणार आहे. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून महिलांना त्यांच्या मुलांवर शौर्याचे संस्कार करता यावेत या हेतूने हा चित्रपट मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही काही ठिकाणी अशा ऑफर सुरु करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना अख्खा शो बुक करून छावा चित्रपट दाखविण्यास सुरुवात केली आहे.
तिकीटावर जीएसटी...
महाराष्ट्रात चित्रपटांवर मनोरंजन कर आकारला जात नसला तरी राज्य आणि केंद्र सरकार जीएसटी आकारत आहेत. २८० रुपयांचे जर तिकीट असेल तर त्यावर राज्याचे २५.९३ आणि केंद्राच्या जीएसटी वाट्याचे २५.९३ रुपये असे ५१.८६ रुपये जीएसटी आकारला जात आहे. यानंतर हे तिकीट जवळपास ३४० रुपयांना मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे दर आहेत. काही ठिकाणी हे जर ७००-८०० रुपयांवर जात आहेत.
तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने पाच दिवसांत १६५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सोमवारी पहिल्यांदाच छावाच्या तिकीट विक्रीत ५० टक्क्यांची घट झाली होती. महाराष्ट्रात हे शो हाऊस फुल होत आहेत. अनेकांना मिळेल ती सीट घ्यावी लागत आहे.
विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याचे राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
पहिला दिवस (शुक्रवार) ३१ कोटीदुसरा दिवस (शनिवार) - ३७ कोटीदिवस ३ (रविवार) - ४८.५ कोटीदिवस ४ (सोमवार): ₹२४ कोटीएकूण संकलन (४ दिवस) १४०.५० कोटी