भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:24 PM2024-05-31T17:24:50+5:302024-05-31T17:26:54+5:30

छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

chhagan Bhujbal again showed power Criticizes BJP leaders | भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे मागील काही दिवसांपासून महायुतीविरोधातच भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. विधानसभेचं जागावाटप, ४०० पारचा नारा, मनुस्मृतीबाबतचा वाद अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी आपली आक्रमक भूमिका जाहीरपणे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. या मागणीचा आज भुजबळ यांना खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

"काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचेही लोकांना वाईट वाटले. मी असं कसं बोलू शकतो, अशी ओरड त्यांनी केली. त्यामुळे मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.
 
मनुस्मृतीबाबतच्या भूमिकेवर कायम, भाजपला काय उत्तर दिलं?

मनुस्मृतीतील काही श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणं, हा मनुस्मृतीचा चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आम्ही याला विरोध करणारच, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. "दरेकर काय म्हणाले हा त्यांचा प्रश्न आहे, आव्हाडांना विरोधासाठी विरोध करु नका.  मुख्य मुद्दा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश होता कामा नये हा आहे, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको हे सांगा, नंतर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करा," अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजप नेत्यांना ठणकावलं आहे.

दरम्यान, "आधी ती मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली होती.फक्त विरोधासाठी विरोध नाही, आमची जी आयडीयालॉजी आहे फुले, शाहू, आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरोधात उभं राहणं, त्याच्यासाठी जो, जो उभा राहिलं त्यांच्या हातून जर चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक. मुंबईतून ते चवदार तळ्यावर गेले होते त्यांच्याहातून चुकून झालं, त्याच्यामागे मनुस्मृती जाळणे ही भावना होती, आता त्यांना शिक्षा काय करायची ती करा माझं काही म्हणणे नाही. तो अधिकार तुम्हाला तुम्ही स्वत: ज्यावेळी मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल तेव्हा येतो.ज्यावेळी तुम्ही स्वत: मनुस्मृती जाळाल तेव्हा तुम्हाला तो अधिकार येईल, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: chhagan Bhujbal again showed power Criticizes BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.