- डिप्पी वांकाणी, मुंबईआॅर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या आणि खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी खा. सुळे यांनी त्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला.सुप्रिया सुळे यांनी खासदार या नात्याने कारागृहाला भेट दिली, असे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले. खा. सुळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुरुंगाला भेट दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, भेटीच्या उद्देशाबाबत काहीही सांगितले नाही. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, खासदार आणि आमदारांना तुरुंगांना भेट देण्याचे अधिकार असून ते भेट देऊ शकतात; परंतु केवळ रक्ताचे नातेवाईक आणि वकिलांनाच कैद्यांना भेटण्याची मुभा आहे. सुप्रिया यांच्याकडे न्यायालयाची परवानगी नव्हती. दरम्यान, मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या निधीत अफरातफर केल्याच्या तक्रारीसंदर्भात आ. पंकज भुजबळ यांनी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात साक्षीदार म्हणून तपासणी करण्यात आली. अफरातफरीची तक्रार सुनील कर्वे यांनी केली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल ईडी आरोपपत्र दाखल करणार आहेत. महाराष्ट्र सदन प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब आणि बँक खात्यांवरील व्यवहाराच्या नोंदी उपलब्ध असून तो पुरेसा पुरावा असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. भुजबळ यांनी कथितरीत्या लाचेपोटी मिळालेला पैसा दडविण्यासाठी उघडलेल्या कंपन्यांवर डमी संचालक नेमले होते. अमित बिराजसारख्या एमईटीच्या माजी कर्मचाऱ्याचा त्यात समावेश होता. एमईटीच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या पैशांची व त्याद्वारे खरेदी केलेल्या मालमत्तेची भुजबळ यांना कल्पना होती, असे या कर्मचाऱ्यांनी ईडीला सांगितले आहे.- मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिलेले जबाब ग्राह्य धरले जातात आणि दिवाणी न्यायालयासमोर दिलेल्या जबाबासारखे त्यांचे मूल्य असते. छगन भुजबळ एमईटीच्या कार्यालयात कशा बैठका घेत आणि पैशांच्या राशी तेथे कशा बरसत हे साक्षीदारांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील, असे ईडी अधिकारी म्हणाला.
छगन भुजबळ-सुप्रिया सुळे यांची भेट?
By admin | Published: March 20, 2016 2:36 AM