डिप्पी वांकाणी, मुंबई महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन आठवड्यांत सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स काढले आहे. या समन्सनुसार भुजबळ यांना १४ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी त्यांचे म्हणणे नोंदवून घेण्यात येणार आहे. एकूण ८७0 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय चौकशी करीत आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १0 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.भुजबळ यांना समन्स पाठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यानेच दिली. मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांच्यासमवेत त्यांचे वकीलही असतील. जबाब नोंदवण्यासाठी आपण १४ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयात हजर राहा, एवढेच त्या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांची १४ मार्चला होणार चौकशी
By admin | Published: March 09, 2016 6:20 AM