नाशिक - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोकण दौऱ्यावर होते. यापूर्वी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी, "अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे," असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना, “कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही. कारण, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे आणि जेव्हा जनता सरकार स्वीकारते, तेव्हा कुणीही हात लावू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मजबुतीने उभे आहे,” असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (Chhagan Bhujbal commented on Narayan rane and devendra fadnavis statement)
येवला मतदारसंघात बांधण्यात आलेल्या नव्या तालुका पोलीस प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी भुजबळ आले होते. तेव्हा ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
“आधी सरकार पाडून तर दाखवा”माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच सरकार बनविण्यासाठी शिडीची आवश्यकता भासणार नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनीही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.”
नारायण राणे विनोद करतात, माहीत नव्हतं - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राणेंच्या उपरोक्त वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही", असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे? -अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा नारायण राणे यांनी काल व्यक्त केली होती.