Chhagan Bhujbal Controversial Statement: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विद्येची देवता सरस्वतीवर केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद सुरू आहे. 'शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची?' असे विधान त्यांनी केले होते. त्या विधानावरून टीका झाल्यानंतर छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आणि आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. मात्र आपल्या सरस्वती विरोधी भूमिकेवर ठाम राहिल्यावरून भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी छगन भुजबळांवर घणाघात केला.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवेसी आहेत. त्यांनी अशी भूमिका मांडून तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदुंमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि दंगली भडकवायच्या असा त्यांचा कट आहे. माफी न मागून आपल्या हिंदुविरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या शरद पवार यांच्या या हस्तकाला पुन्हा एकदा अंडा सेल दाखवण्याची आता वेळ आली आहे, अशा शब्दांत आचार्य भोसले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
छगन भुजबळांनी काय दिलं स्पष्टीकरण?
"हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे. मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळेच सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. मीदेखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो. पण, देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे," असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.