Sambhaji Bhide Vs NCP: संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या विधानाविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, अशी भूमिका घेतली आहे.
१५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असे संभाजी भिडे गुरुजी म्हणाले होते. संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे म्हटले, हे जर दुसरे कोणी म्हटले असते. तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
न्यायव्यवस्थेने देखील जरा सुद्धा दया दाखवता कामा नये
पुण्यात तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात हे काय चाललेय काय? महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केले. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे? पोलीस आयुक्त काय करतात? यावर कडक कारवाई करा. न्यायव्यवस्थेने जरा सुद्धा दया दाखवता कामा नये, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.