हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केल्यानंतर राज्यात जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा सामना सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत विविध पक्षांतील ओबीसी नेते मैदानात उतरले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंगोली येथे दुसरा ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार प्रहार केला. तसंच जरांगे यांची भेट घेणारे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावरही शेलक्या शब्दांत निशाणा साधला.
"बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचं घर जाळण्यात आलं. त्यांचं कुटुंब थोडक्यात वाचलं. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबियांचं दु:ख समजून घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा संदीप क्षीरसागर म्हणाले की कामानिमित्त मी छत्रपती संभाजीनगरला आलो आहे. मात्र मी नंतर बघितलं तर रोहित पवार हे संदीप क्षीरसागरांना घेऊन जरांगेंना भेटायला गेले होते. आमचं घर अर्धच का जाळलं म्हणून जरांगेंच्या माफी मागण्यासाठी तुम्ही गेला होतात का?" असा बोचरा सवाल विचारत भुजबळांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ यांनी आजच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा जोरदार समाचार घेतला. "मराठा समाजाचे आता एक नवीन नेते तयार झाले आहेत. ते म्हणतात की लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागत आहे. म्हणजे ओबीसी, एससी, एसटींची लायकी नाही का? शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुजन समाजातील लोक होते. त्यांची लायकी होती म्हणून त्यांनी शिवरायांना साथ दिली. अनेक संत वेगवेगळ्या बहुजन जातीतील होऊन गेले. त्यांची लायकी होती की नाही," असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आम्ही झुंडशाही खपवून घेणार नाही. मराठा समाजाला किंवा मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात मराठ्यांचा समावेश करू नका, ही आमची मागणी असल्याचा पुनरुच्चारही आजच्या सभेतून छगन भुजबळ यांनी केला आहे.