Chhagan Bhujbal ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेली २४ डिसेंबर हे डेडलाइन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने काल जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदिपान भुमरे आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचाही समावेश होता. सरकारने आधी लिहून दिल्याप्रमाणे एखाद्याची नोंद आढळल्यानंतर सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगेंकडून करण्यात आली. सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्यांना विशेष महत्त्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर उपरोधिक शैलीत जोरदार हल्ला चढवला आहे.
"सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत. एखाद्या महिलेची कुणबी नोंद आढळल्यानंतर तिच्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं. एवढंच कशाला, मंत्र्यांचे दोन-तीन बंगलेही जरांगेंच्या उपोषणस्थळीच बांधायला हवे. तसंच मुख्य सचिवांचाही बंगला तिकडेच बांधायला हवा. म्हणजे जरांगेंनी एखादी मागणी केली की लगेच त्याचा जीआर सरकारला काढता येईल. बंगलेच तिकडे बांधल्याने जाण्या-येण्याचा वेळही वाचेल," असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक शब्दांत विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचाही सपाटा लावला आहे. मात्र तरीही भुजबळ ज्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, त्याच सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनालाही महत्त्व दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज जरांगे यांच्याविरोधात न बोलता उपरोधिक शैलीत सरकारलाच लक्ष्य केलं.
"जरांगे नाही...सरकारच वेठीस धरतंय"
मनोज जरांगेंकडून सरकारला वेठीस धरलं जात आहे का, असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान छगन भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मनोज जरांगे हे अजिबात सरकारला वेठीस धरत नाही. उलट सरकारच वेळकाढूपणा करत आहे. जरांगेंच्या मागण्या ताबोडतोब मान्य करायला हव्यात," असा खोचक टोला भुजबळांना लगावला. तसंच मी आतापर्यंत केलेली सर्व भाषणे मागे घेतो, सर्व वक्तव्यं मागे घेतो, असं म्हणत भुजबळ यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.