नाशिक – दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thaackeray) यांना नैराश्य आले आहे. त्यांना केवळ मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते पण स्वत: झाले. इतर नेत्यांना बाहेर का पडावं लागलं? असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर छगन भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो. मी शिवसेना(Shivsena) सोडल्यावर स्वतः बाळासाहेब सुद्धा हे म्हणायचे. मात्र मला त्याची खंत नाही. ओबीसींच्या(OBC) कारणामुळे मी शिवसेना सोडली. मला काँग्रेससह इतर पक्षांचंही आमंत्रण होतं, आमच्याकडे या मुख्यमंत्री करतो असंही त्यांनी सांगितलं.
परंतु मी पवार साहेबांची साथ पकडली. राष्ट्रवादी काँग्रेसनं मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांना कोणी विचारत नाही. परंतु लोकांचं मला भरपूर प्रेम मिळतं. फडणवीस यांच्यात भ्रष्टाचार आरोप असलेला गुण हा उद्धव ठाकरे यांच्यात नाही. फडणवीस हे क्लीन चिट मास्टर आहेत. हा अवगुण आहे असं मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही असा उपरोधिक टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत. आता मुखवटा काढा आणि मान्य करा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते, देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही. जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं.
आणखी वाचा
...मग राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप