ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.17- ऑर्थर रोड जेलमध्ये अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकृती बिघडल्यानंतर भुजबळांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्याचबरोबर त्यांना तापही होता. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या असून त्यांच्या पुढील तपासण्या सुरु असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. सध्या भुजबळांवर मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (एमआयसीयू) मध्ये उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटत होते. प्रकृती बिघडल्यानंतर जेजे रूग्णालयातील डॉक्टारांच्या एका पथकाने त्यांची तुरूंगात जाऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप नेमके कारण समोर आले नाही. मात्र, त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.