मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या आतून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत. ओबीसींना दिलेलं अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला मिळावं, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून सध्या जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते आमने-सामने आले आहेत.
दरम्यान, आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे मोठी सभा घेऊन सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यामध्ये राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावरून आक्रमक भूमिका घेतली. तसेच मनोज जगांगे पाटील यांच्यावरही घणाघाती टीका केली. मात्र आता या वादात संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली असून, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
फेसबूकवर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली.