Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला नसताना राज्यात विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत. मात्र आता विधानसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे मंत्री छगन भुजबळ यांचे जागा वाटपाबाबत केलेले विधान. महायुतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिलेला असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठकीत छगन भुजबळांनी हे विधान केले. भुजबळांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता भुजबळांनी नरमाईच भूमिका घेतली आहे.
"लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष लावण्यात आला. विधानसभेला तसे होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी केली. महायुतीमध्ये येताना भाजपाने दिलेल्या शब्दाप्रमाणे विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. ८०-९० जागा मिळाल्या तर ५०-६० निवडून येतील. आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे," असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले.
"विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या यासंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना योग्य जागा मिळतील. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे आम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील. पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल," असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
छगन भुजबळांची नरमाईची भूमिका
"मी केवळ चर्चेची आठवण करुन दिली की, या बाबतीत आता सतर्क राहा आणि ऐनवेळी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही आम्हाला जे सांगितलं आहे त्याप्रमाण घडवून आणा. आम्हाला जे सांगितले तेच मी पक्षाच्या बैठकीमध्ये बोललो. याबाबत कुठेही बाहेर बोललेलो नाही. भाजप हा आमच्या महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. एवढा काही मी मूर्ख नाही की त्यांना कमी आणि आम्हाला जास्त जागा द्या असे सांगायला," असे स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिले.