गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध होताना पाहायला मिळत आहे. गावबंदीमुळे आमदार खासदार यांना गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना काम करू दिले जात नव्हते. हा गुन्हा आहे याला एक महिन्याची शिक्षा देखील आहे. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देत मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आम्ही गप्प बसायचं, मग त्यांनी जाळपोळ करायची. बीडमधील जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. २४ डिसेंबरचा सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. झुंडशाहीला, दादगिरीला माझा विरोध आहे. समाज माध्यमावरील मेसेजही वाचून दाखवला आहे. प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली त्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल भुजबळांनी भीती व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बीडमध्ये अनेकांची घरं, कार्यालय ऑफिस कट करून पेटवण्यात आली. यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे मात्र ते वाचले, असे छगन भुजबळ म्हणाले.
याचबरोबर, काही नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिमेकवर भाष्य केले आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एकदा ओबीसीमध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार आहे. ओबीसीमध्ये आलात तर त्याला सर्व लाभ मिळतात. या विषयावर नेते बोलायला घाबरतात. याचे मुख्य कारण निवडणूक आहे. प्रत्येकला वाटत आहे, विरोधात बोलले तर मराठा समाजाचे मत मिळणार नाही, म्हणून भुजबळ यांच्या विरोधात बोला, असे छगन भुजबळ म्हणाले. याशिवाय, माझे वय ७६ वर्षे आहे. गेली ३५ वर्ष ओबीसीसाठी काम करत आहे. मी जेव्हा राजकारणात आमदार होतो तेव्हा फडणवीस नव्हते. कोणी मला सांगावे अशी परिस्थिती नाही, माझे निर्णय माझे असतात आणि परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.
१७ डिसेंबरच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार - मनोज जरांगे पाटील २४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे, हे सगळ्यांना कळेल. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होतं. त्याच अनुषंगाने आज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होते, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. १७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होते. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.