मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये 'निर्णायक इशारा सभा' पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, येवल्याच्या येडपटा आता शांत बस. काही वेडवाकडं बोलू नको. झोपून राहा. माझ्या नादाला लागू नको. नाहीतर दणकाच दाखवेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. यावर आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज जाहीर सभा झाली. सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होते. माझं नाव नाही घेतलं, मग भाषण करणार तरी काय? बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. मी कालच म्हटलं व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी आज घेतला नाही. काय झालं माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलतात, असे छगन भुजबळ म्हणाले.
सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणतात, मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका,आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरं आणि हॉटेल जाळलं. आता भुजबळांचं नाव घेत आहेत. थोड्यावेळाने म्हणतात, मराठ्याच्या वाट्याला जाऊ नका. बीडला काय होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे बीडला जे झालं ते तुम्हीच केलं हे सिद्ध होतं ना? तुम्हीच कबूल केलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं आलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, त्यांच्या भाषणात विसंगीत येणार नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला.
कधी म्हणतात येवल्याचा येडपट आहे. मी जर म्हटलं… (हातवारे करत इशारा) ते बोलायचं नाही असं ठरलं आहे. जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल, ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाही तर बाहेर राहतात. 12 इंच छाती आहे, ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. कोणी आरे म्हटले तर कारे कोणीतरी करणार आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढला आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढत आहे, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे.
क्युरेटिव्ह दाखल झाल्याने दिलासा मिळाला मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशीच आमची मागणी आहे. क्युरेटिव्हच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला चर्चा करता येईल. सुप्रीम कोर्ट निर्माण केलेला अडथळा दूर करेल, असे छगन भुजबळ म्हणाले.