"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:16 AM2024-11-08T10:16:33+5:302024-11-08T10:21:25+5:30

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti: सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते हे समजल्यावर अजित पवारांनाही घाम फुटला होता, असाही पुस्तकात उल्लेख

Chhagan Bhujbal said Ajit Pawar led NCP joined BJP to get rid of ED sensational claim in the book by Rajdeep Sardesai | "ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti: ‘अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला; माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, असे मत राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत व्यक्त केल्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या '२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत. या पुस्तकातील 'हमारे साथ ईडी है' या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य सांगितल्याचे पुस्तकात दिसून येते. छगन भुजबळ यांच्या कार्यालयाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशी कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे भुजबळ यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भुजबळ काय म्हणाले?

पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले, "मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही."

"मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली," असे भुजबळ म्हणाले असल्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.

अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवार यांना घेरण्यात आले होते. या कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दिली. यानंतर अजित पवार यांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर खल झाला. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोवर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील वा त्यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी ईडीच्या जाचातून वाचण्यासाठी भाजपासोबत गेल्याच्या दाव्याचा इन्कार केला असून 'आमच्यासमोर विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार देणारे मोदी असे दोन पर्याय होते. आम्ही स्थिर सरकारला प्राधान्य दिले, असा उल्लेखही पुस्तकात करण्यात आला आहे.

Web Title: Chhagan Bhujbal said Ajit Pawar led NCP joined BJP to get rid of ED sensational claim in the book by Rajdeep Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.