Chhagan Bhujbal special style: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेत फूट पडली. शिंदे गटाने ४० आमदारांच्या बळावर भाजपासोबत सत्तास्थापना करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीला धक्का हा पर्यायाने मविआचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे सर्वच पक्षांनी कार्यकर्ते मेळावे घेण्यास सुरूवात केली असून आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत नेते छगन भुजबळ यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली.
एकनाथ शिंदे गटातील शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. 'काय डोंगर, काय झाडी, काय हाटिल, ओके मध्ये आहे'.. हा त्यांचा डायलॉग चांगलाच गाजला. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनीही याच स्टाईलमध्ये भाषणाला सुरूवात केली. "बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओकेमध्ये आहे" अशी भाषणाची एकदम झक्कास सुरुवात करत नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
राजकीय विषयांवरही छगन भुजबळ यांनी मत मांडले. "ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. आडनावावरून नोंदणी करु नका तरी केली गेली. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी ५४ टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत. आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. 'गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही", असा शायरीतून छगन भुजबळ यांनी इरादाही स्पष्ट केला.