Chhagan Bhujbal: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक वेगळाच प्रकार राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाला. शिवसेना भाजपाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत गेली आणि त्यांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे मविआचे नेते ओरडून ओरडून सांगत असतानाच, राज्यात अडीच वर्षांनी आणखी एक वेगळाच प्रकार घडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाच्या ५० आमदारांच्या साथीने भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून महाविकास आघाडीचे नेतेमंडळी, आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपा-शिंदे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण आज मात्र राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे आभार मानले. यामागे नक्की कारण काय.. जाणून घेऊया.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरूषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले. बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या तैलचित्राशेजारी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.