मुंबई – सरकारी कर्मचारीही ५८ व्या वर्षी निवृत्त होतात, आयएएस, आयपीएस ६० व्या तर भाजपातही ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते मग आपण कुठेतरी थांबणार की नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी शरद पवार Sharad Pawar यांना थेट प्रश्न केला होता. अजित पवारांच्या या विधानानंतर आज पत्रकारांनी छगन भुजबळ यांना २०२४ ला तुम्ही शेवटची निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी रोखठोक विधान केले.
छगन भुजबळ आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, वय झाल्यामुळेच मी प्रदेशाध्यक्षपद यावेळी स्वीकारले नाही. १९९९ मध्ये शरद पवारांनी मला प्रदेशाध्यक्ष केले, ४ महिने राहिलो. आताही प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप कामे असतात. पक्षसंघटनेसाठी फिरावे लागते. बाकी इतर मंत्र्यांना कामे असतात जिथे बोलावले जाते तिथे जायचे. मी शरद पवारांसोबत असताना प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात होतो. आमचे काम करत होतो. यापुढेही अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सांगितले भुजबळ तुम्ही थांबा, तर मी थांबेन असं त्यांनी सांगितले.
कायदेतज्ज्ञांशी चर्चा करूनच निर्णय
जे मागच्यावर्षी घडले, निवडणूक आयुक्त, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, सुप्रीम कोर्टाने केलेली उकल यातून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यामार्गाने गेले तर कुठेही अपात्र होणार नाही. २-४ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून खात्री पटली, विश्वास बसला त्यानंतर पुढची पाऊले उचलण्यात आली आहेत असं भुजबळ यांनी म्हटलं.
शेवटपर्यंत मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केले
आम्ही सरकारमध्ये सामील होण्याअगोदर याबाबत जी कागदपत्रे, सह्या आहेत त्या केलेल्या आहेत. निवडणूक आयोगासमोर दाखल केलेत. अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत आणि यापुढे राहतील असे सांगितले आहे. पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे नियम या सर्व गोष्टींची चर्चा करून त्याची मांडणी करण्यात आली आहे. आम्ही शेवटपर्यंत काही मार्ग निघतोय का यासाठी प्रयत्न केला. सुप्रिया सुळेही होत्या. सर्व आमदार, अजित पवार आणि नेते, सुरुवातीला जयंत पाटील, सुप्रिया सुळेंशीही चर्चा झाली. महिना-दोन महिने चर्चा सुरू होती. काल काही गोष्टी अजित पवारांनी उघड केल्या. शेवटपर्यंत काही मार्ग निघतोय का यासाठी प्रयत्न केला परंतु ते झाले नाही मग आम्ही पुढे गेलो असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
सातत्याने शब्द देऊन फिरवला तर राग येतो
एखाद्याला शब्द देऊन एकदा-दोनदा फिरवला तर ठीक पण सातत्याने शब्द फिरवला तर समोरच्याला आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल राग येणे स्वाभाविक आहे. एकतर चर्चा करू नका, चर्चा करून मागे फिरता. हे सातत्याने घडत होते. विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. २-४ लोक होती त्याप्रमाणेच होत होते. सूचना करूनही काहीच घडत नव्हते. अजित पवारांनी उघडपणे याबाबत वाच्यता केली. त्यानंतरही सगळे मोघम ठेवण्यात आली. चर्चा झाली नाही. ऑफिसमध्ये १०-१२ वर्ष काम करणारे कार्यालयीन पदाधिकारी हेसुद्धा तिथून का सोडून आले त्याला काही कारणे आहेत. नको ती माणसे डोक्यावर नेमली गेली. २-४ लोकांना घेऊन पक्ष चालवायला लागले तर ही सगळी माणसे मनातून दुखी होऊन दुसरीकडे वाट शोधतात. त्यांना अजित पवारांची वाट मिळाली आणि ते आले असं भुजबळांनी सांगितले.
शरद पवारांच्या फोटोबाबत चर्चा करू
शरद पवारांचा फोटो ठेवला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटत होते. परंतु काल साहेबांनी स्पष्ट शब्दात फोटो वापरू नका असं म्हटलं त्यावर पक्षातील नेतेमंडळी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती भुजबळांनी दिली.