ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपांमध्ये अडकलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून भुजबळ यांची सांताक्रूझ व वांद्रे येथील मालमत्ता मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली. या दोन्ही मालमत्तांची मूल्य सुमारे ११० कोटी रुपये इतके आहे. गेल्या महिन्यातच भुजबळांच्या खारघरमधील मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली होती. त्यानंतर आता वांद्रे व सांताक्रूझ येथील मालमत्ताही जप्त झाल्याने भुजबळ यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळण्यात आल्याचे दिसत आहे.
कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम झाले. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एसीबीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला.