ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयवारी वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आर्थर रोड जेलचे अधिकारी व काही डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवार १८ एप्रिल रोजी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मुळात त्यांनी दाढदुखीची तक्रार केल्याने त्यांना तुरूंगाबाहेर जाऊन सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. मग अचानक त्यांच्या छातीत कसे दुखू लागले? आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना कार्डिओलॉजी विभाग नसणा-या सेंट जॉर्ज रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याप्रकरणाची चौकशी आता तुरूंग महानिरीक्षक बिपीनकुमार सिंह करणार आहेत.
महाराष्ट्र सदन आणि इतर काही प्रकरणात घोटाळा केल्याचे भुजबळांवर आरोप आहेत. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्याभरापासून आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. दात दुखत असून छातीतही दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हा सर्व प्रकार संशयाच्या भोव-यात सापडला असून दात दुखत असतानाही भुजबळ एकदाही दंतवैद्यकीय रुग्णालयात का गेले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच अनेक डॉक्टरांनी याप्रकरणी परस्परविरोधी माहिती दिल्याने संशयात आणखीन भरच पडली असून तुरूंग अतिरिक्त पोलीस महासंचालक बी.के. उपाध्याय यांनी तुरूंग महानिरीक्षक बिपीनकुमार सिंह यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान तुरूंगवारी भोगावी लागणा-या राजकारण्यांमध्ये तुरूंगातून काही काळ बाहेर घालवण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय लोकप्रिय आहे. यापूर्वीही अनेक राजकारण्यांनी आजारपणाच्या निमित्ताने अनेक काळ या रुग्णालयात घालवल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या खुनाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड व राजकारणी अरूण गवळीनेही तुरूंगापेक्षा बराच काळ या रुग्णालयात घालवला होता.