लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन सा. बां. मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ईडीने या तिघांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी संमती दर्शवली आहे.
८५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात ईडीने २०१६ मध्ये छगन भुजबळ, पंकज व समीर भुजबळ यांच्यासह ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खटल्याची सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे सुरू आहे. यातील सुनील नाईक, सुधीर सालस्कर, अमित बलराज या आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट व ॲड. दीप्ती कराडकर यांनी बाजू मांडली.
सत्य उघड करा... न्यायालयाने इतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सुनावणी घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा युक्तिवाद करीत ॲड. मर्चंट यांनी संबंधित तीन आरोपींच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली आणि तिघांच्या अर्जांवर ईडीला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. ईडीने बुधवारी त्यास मंजुरी दिली. ईडीतर्फे ॲड. सुनील घोन्साल्वीस यांनी उत्तर सादर केले. त्यात त्यांनी म्हटले की, सीआरपीसी सेक्शन ३०६ नुसार माफीचा साक्षीदार या तिघांना बनवले जाणार असून त्यांनी सर्व सत्य गोष्टी उघड कराव्यात.