मुंबई - शिवसेनेत व्हिप बदलले, कुणी व्हिप काढले, कुणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टीची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली. आमच्याबाबतीत ही परिस्थिती नाही. आमचा व्हिप बदललेला नाही. आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला. त्यामुळे कुठलाही गट असता तरी ज्याच्याविरोधात हा निकाल लागला तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणारच. कालच्या निकालात व्हिप कोण, व्हिपचा आदेश बरोबर आहे का? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का? या असंख्य गोष्टी फिरत होत्या. मात्र आमच्या बाबतीत तसे नाही. आमचा व्हिप बदलेलाच नाही. जो व्हिप आधी होता तोच आताही आहे. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे. दीड तास निकालाचे वाचन सुरू होते असं भुजबळांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन्ही बाजूची सुनावणी होणार आहे. आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू. त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव
लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.