मुंबई : समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी केली. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले भुजबळ अलीकडेच जामिनावर बाहेर आले आहेत.छगन भुजबळ यांच्या उपस्थित आज मुंबईत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी छगन भुजबळ यांनी राज्यव्यापी दौरा करावा, अशी मागणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर प्रत्येक जिल्ह्यात दौरा करण्याचे भुजबळ यांनी मान्य केले. समता परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षांनंतर आपली भेट होत आहे. या काळात कार्यकर्त्यांनी साथ दिली, मोर्चे काढल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत भुजबळ म्हणाले की, समता परिषद ही बहुजन समाजाची संघटना आहे. सर्व जाती-धर्माचे लोक संघटनेत विविध पदांवर तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे.
छगन भुजबळांचा राज्यव्यापी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:42 AM