- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये विनापरवाना डान्सबार सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे. पोलिसांची परवानगी न घेता बिनधास्तपणे डान्सबार सुरू असून बारबालांवर पैशांची उधळण सुरू आहे. या अवैध व्यवसायाकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. नेरूळमधील शिरवणे गावामधील ‘दीपिका बार’, बुधवारी रात्री ८ वाजण्याची वेळ. परवानगी नसतानाही येथे बिनधास्तपणे डान्सबार सुरू होता. मद्यपी बारबालांवर पैशांची उधळण करत होते. ५० ते २०० रुपये दिले की मनपसंत गाणे सादर केले जात होते. लेडीज सर्व्हिस बारच्या नावाखाली येथे अनेक दिवसांपासून डान्सबार चालविला जात आहे. बारमध्ये आक्षेपार्ह हावभाव केले जातात. पोलीसही कारवाई करत नाहीत. गुरुवारी खैरणे एमआयडीसीमधील ‘सावली बार’मध्ये जाऊन पाहणी केली असता तेथेही डान्स सुरू असल्याचे निदर्शनास आले. शहरात ५० बारमध्ये याच पद्धतीने डान्स सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच हे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने डान्सबारना परवानगी देण्यासाठी नवीन नियमावली केली आहे. या आधारावर शहरातील जवळपास १० बारमालकांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु अद्याप कोणालाच परवानगी मिळालेली नाही. लेडीज सर्व्हिस बारचा मुखवटालेडीज सर्व्हिस बारच्या नावाखाली डान्सबार सुरू आहेत. या बेकायदा बारमध्ये तरुण गर्दी करू लागले आहेत. बारबालांवर रोज लाखो रुपये उधळले जात आहेत. पैसे उधळण्यासाठी ग्राहकांना १० रुपयांच्या नोटांचे बंडल उपलब्ध करून दिले जाते. नवी मुंबईत शिरवणे, खैरणे एमआयडीसी, कोपरखैरणे, एपीएमसी, सीबीडी, कळंबोली, पनवेल, कोन, पळस्पे फाटा, काळुंद्रे व इतर अनेक ठिकाणी हे डान्सबार सुरू आहेत. बहुतेकांवर राजकीय वरदहस्त असल्याचा अर्थपूर्ण फायदा स्थानिक पोलीसही घेत आहेत. तर काही ठिकाणी आयुक्त, उपआयुक्त यांची दिशाभूल करून स्थानिक पोलीस डान्सबारवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांनी २००५ मध्ये मांडलेल्या लक्षवेधीनंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु त्याच पनवेल व नवी मुंबई परिसरात पुन्हा बेकायदा डान्सबार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दौलतजादा करणाऱ्यांचेही प्रमाण मोठेअपुऱ्या जागेतही अनेक डान्सबार सुरूअसल्याने त्या ठिकाणी दुर्घटनेचीदेखील शक्यता आहे. बारबालांसह ग्राहकांनादेखील नाचण्याची मुभा त्या ठिकाणी दिली जात आहे. असाच प्रकार शिरवणेतील दीपिका बारमध्ये पाहायला मिळाला. तळमजल्यावर लिकर बार सुरू असून पहिल्या मजल्यावर डान्सबार चालवला जात आहे. ग्राहक टेबलवर बसताच टेबलभोवती बारबाला नाचवल्या जात असून ग्राहकाची मर्जी असल्यास बारबालेला सोबत बसवून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचीदेखील मुभा दिली जात आहे. एखाद्या बारबालेचे नृत्य आवडल्यास तिच्यावर दौलतजादा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. हा आनंद लुटण्यासाठी मद्यपींकडून कोपरखैरणे, नेरूळ, सीबीडी, कळंबोली, पळस्पे फाटापर्यंतची पायपीट केली जात आहे.डान्सबारवरील बंदी उठली असली तरीही त्यास महिलांचा विरोधच आहे. शासनाने बार व्यावसायिकांच्या हितापेक्षा राज्याची संस्कृती जपण्यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तरुण पिढी व्यसनाधीन होईल. - माधुरी सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षापोलीस आयुक्तालय क्षेत्रात डान्सबारसाठी अर्ज आले होते. परंतु एकालाही परवानगी दिलेली नाही. यामुळे परवानगीशिवाय डान्सबार सुरू असतील, तर त्यावर कारवाईचे आदेश सर्व अधिकारी व स्थानिक पोलिसांना दिले जातील. - प्रभात रंजन, पोलीस आयुक्त