उल्हासनगर - साऊंड ऑफ म्युझिक मोबाइल दुकानातून रविवार पहाटे 5 वाजता तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल चादर गॅंगने लंपास केलेत. कॅम्प नं-3 परिसरातील ही घटना आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. व्यापाऱ्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं- 3 परिसरात मोबाइल मार्केट असून शिवाजी चौकात साऊंड ऑफ म्युझिक मोबाइलचे दुकान आहे. रविवारी पहाटे 5 वाजता 6 जणांच्या टोळीने चादर टाकून दुकानाचे शटर तोडुन विविध कंपनीचे तब्बल 56 लाख रुपयांचे मोबाइल लंपास केले.
सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दुकानाचे मालक लक्ष्मण गंभानी यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे. तसेच तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळदाते पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चादर गॅंगमधील 6 जणांची ओळख पटविण्यात येत आहे. गॅंग लवकरच जेरबंद होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले असून व्यापाऱ्यांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.