मुंबई : घाटकोपरच्या सिद्धिसाई इमारत दुर्घटनेच्या २५ दिवसांपूर्वीच तळमजल्यावरील मॅटर्निटी होम बंद केले असल्याची माहिती समोर येत आहे. याच दिवसांत कामाचा वेग वाढवून, शितपच्या सांगण्यावरून तळमजल्यावरील पीलर तोडल्याचे, लालचंद रामचंदानी यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. घटनेच्या दिवशीही शितप इमारतीतच होता. तो बाहेर पडताच, इमारत कोसळल्याचेही रामचंदानी यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करत, अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी सुनील शितपच्या कोठडीत बुधवारी ७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.घाटकोपर परिसरात १९८३ मध्ये बांधलेल्या सिद्धिसाई इमारतीच्या तळमजल्यावर, २००७ मध्ये शितपने ‘शकुंतला मॅटर्निटी होम’ सुरू केले. २५ जुलैला इमारत कोसळून १७ जणांचे बळी गेले. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या २५ दिवसांपूर्वीच शितपने येथील मॅटर्निटी होम बंद केले होते. त्यानंतर, आतील पीलर तोडून तेथे हॉल तयार केला होता, अशी माहिती तक्रारदार रामचंदानी यांनी जबाबात दिली. घटनेच्या दिवशीही शितप इमारतीत होता. तो इमारतीतून बाहेर पडला, तेव्हा आपल्याला हात दाखवून तो कारमध्ये बसून निघून गेला. तो बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळल्याचेही रामचंदानी यांनी जबाबात नमूद केले आहे.या प्रकरणी शितपची कसून चौकशी सुरू असून, बुधवारी त्याला विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सिद्धिसाई इमारतीतील रहिवाशीही उपस्थित होते. पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीत, घटनास्थळाचा पंचनामा झाला असून, घटनास्थळावरून लोखंडी बीम हस्तगत केले आहेत. शितपच्या घरातून दोन मोबाइल, वास्तुविशारद रंजीत आगळेच्या कार्यालयातून ३ हार्डडिस्क हस्तगत करण्यात आल्या आहेत, तसेच पालिकेकडून स्ट्रक्चरल आॅडिट अहवालही मिळाला आहे. शिवाय शितपच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून वास्तुविशारद आगळेचा शोध सुरू आहे. ७ कामगारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, अन्य कर्मचाºयांचे जबाब नोंदविणे बाकी आहे. यातील साधनसामग्री त्याने कोठून विकत घेतली, याबाबत तपासासाठी शितपसह मंडल यांच्या कोठडीत ७ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली.
घाटकोपर दुर्घटनाप्रकरणी शितपच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:15 AM