मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांच्या या विधानाविरोधात सत्ताधारी नेते कमालीचे आक्रमक झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचं वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं असल्याची टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे.
शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस हाल केले. तुम्ही धर्मपरिवर्तन करा, मुस्लिम धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला सोडतो. असं सांगितलं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी देहाचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षक का म्हणायचं नाही. दादांन हे मान्य नाही. संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान योग्य नाही असं दादांना वाटतं का. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर धर्मरक्षकच म्हटलं गेलं पाहिजे. कारण हिंदू धर्मासाठी त्यांनी अनन्वित हाल सोसले होते.
शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषांबाबत महापुरुषांबाबत सेना-भाजपाच्या सरकारमधील मंत्री, पदाधिकारी काय बोलतात, याबाबत अजित पवार यांनी त्वेशानं भाषण केलं होतं. सुरुवातीचं ते भाषण आणि आताचं सभागृह संपतानाचं हे भाषण. एका बाजूला स्वत: सांगायचं की थोर पुरुषांचा आदर करा आणि दुसऱ्या बाजूला सभागृह संपताना छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका म्हणून सांगायचं. याचा अर्थ लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचं अजितदादांचं हे वक्तव्य आहे. त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असं सांगणं हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि आपण बोललो हे चुकीचं आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.