मुंबई - वर्धा येथील हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला त्याचा सर्वस्तरातून निषेध होताना दिसत आहे. या घटनेवरुन संतापलेले छत्रपती संभाजी महाराजांनी आता बस्स, सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? असा सवाल खासदार संभाजीराजे भोसले यांनी विचारला आहे.
याबाबत फेसबुक पोस्ट लिहिताना संभाजीराजे म्हणाले की, माणूसपणाला काळीमा फासणारी ही घटना आहे. हे वाक्य फार हलकं वाटेल अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली. त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे.आयुष्याची स्वप्न डोळ्या समोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलिसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना सध्या तयार झाली असल्याचं संभाजीराजेंनी सांगितले.
दरम्यान, याशिवाय अशा नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे असं संभाजीराजेंनी सांगितले.
वर्धा येथील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका माथेफिरू विवाहित तरुणाने प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीर जखमी झाली तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपुरला हलविण्यात आले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटताना पाहायला मिळत आहे. नराधम आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. यासाठी विविध भागात मोर्चा काढण्यात येत आहे.