मुंबई : महाराष्ट्रातील किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी वारसास्थळ धोरण आखले जाईल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केले. तसेच राज्यातील शिवकालीन किल्ले व गड यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पर्यटन दूत म्हणून निवड करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. रावल म्हणाले, खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा किल्ले व गड यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची पर्यटन राजदूत म्हणून या वेळी निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी राजे म्हणाले, महाराष्ट्रातील इतिहास जगासमोर यावा यासाठी अनेक वर्षे मी काम केले. महाराष्ट्रातील वारसास्थळांचे तसेच इतिहासातील गड व किल्ले यांचे पावित्र्य जपण्यासाठी वारसास्थळ जतन धोरण आखणे गरजेचे आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी २०१७ हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केल्याची नांदी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी राजे भोसले यांची पर्यटन दूत म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 5:05 AM