मुंबई – नांदेड इथं आम्ही न बोलवता सुद्धा ५० ते ७० हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती. तीही नं सांगता, मग सांगून बघू का? मग बघा अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून(Maratha Reservation) ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
छ. संभाजीराजे म्हणाले की, सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल. त्यासाठी तयारी आहे. पुन्हा नांदेडला जशी गर्दी जमली तशी गर्दी झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. हे सरकारला चालेल का? समाजाला वेठीस न धरता एकटं आंदोलन करू ज्यामुळे गर्दी होणार नाही असंही त्यांनी सांगितले.
तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाला १८८५ कोटी निधी वाटला असं सांगतात, हे अधिकारी फसवतात. हे सरकारने दिलेले नसून बँकांनी पैसे दिलेत. हे मागच्या सरकारचे आहेत. तुम्ही किती दिलेत ते सांगावं. आत्ता जाहीर केलेले साडेबारा कोटीही मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याच्या सरकारने काहीही केलेले नाही असा आरोप छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati SambhajiRaje) यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखलही घेतली नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र मान्य नाही. राज्य सरकारनं पाठवलेले पत्र हे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. फक्त पाठवायचं म्हणून लेखी उत्तर पाठवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनीही याची पुरेशी दखल घेतली नाही अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
'गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा
काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होतं. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच मुद्द्यावरुन भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला होता. "गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळ न्याय, असे का?", असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.