मुंबई : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. यानंतर महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. तसेच, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याबद्दल ट्विट करून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.
'तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही. महाराजांचा सन्मान हा संपूर्ण हिंदुस्थानची जनता करते. बेळगावच्या शिवभक्तांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे.', अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे.
याचबरोबर, कर्नाटक सरकारने वेळीच जागे व्हावे. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी. कर्नाटक सरकारने चूक सुधारावी, असा शब्दांत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. तसेच, या देशाची संस्कृती टिकली ती महाराजांमुळे. कधीकाळी संपूर्ण कर्नाटक महाराजांच्या घोड्यांच्या टापाखाली आला होता, आज कर्नाटक जरी वेगळं राज्य असलं तरी आपली संस्कृती एकच आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, आपण सर्व जण भारतीय आहोत. आपण सर्वांनी भारतियत्वाची भावना जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. शिवछत्रपती हे राष्ट्रभावनेचे मूलाधार आहेत. कर्नाटकातले देश बांधव सुद्धा महाराजांवर प्रेम करतात हा आमचा अनुभव आहे, असेही संभाजी राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात 5 ऑगस्टला बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यावेळी शिवसैनिकांनी भाजपा आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.