मुंबई : मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (chhatrapati sambhaji raje will soon clear his stand about Maratha Reservation)
काही दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायदा (२०१८) सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला. याबाबत निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्दे मांडलेले आहेत. त्यापैकी १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नाहीत, असे मत नोंदविले आहे. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
त्याच पद्धतीने हा संपूर्ण विषय महाराष्ट्र शासनाशी व शासनातील अधिकारांशी थेट निगडीत असल्याने, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी व अंतिमतः मराठा आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीनेदेखील अशी फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
यानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, याच मुद्द्यावरून मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे. अशावेळी छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.