राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून बोलावणे आल्याचे समजते आहे. संभाजीराजेंकडून शिवसेनेला होकार आला नसल्याने संजय पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. असे असताना पवार यांनी संभाजीराजे आमचे राजे! दैवत, अपमान होईल असे वागणार नाही, असे म्हणत आपल्याला अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही संकेत आलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे.
संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. ते आमचे राजे आहेत. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत. राजेंचा माझ्याकडून असा कुठला अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही, असे संजय पवार यांनी सांगितले. परंतू जर उद्धव ठाकरेंनी लढ म्हटले तर मला लढावेच लागेल, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
गेल्या ३० वर्षांत मी अनेक चढऊतार पाहिले. सामान्य कार्यकर्ता ते तालुकप्रमुख, नगरसेवक जिल्हाप्रमुख ही पदे सांभाळली. परंतू कधी पक्षाकडून अपेक्षा केली नाही. शिवसेनेत काम पाहून संधी दिली जाते. जर संधी मिळाली तर ती कोणाला नको असते, असे सांगत जर पक्षाने राज्यसभेसाठी संधी दिली तर आपण ती लढण्यास तयार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.
संभाजीराजे मुंबईकडे निघाले... छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत. निघण्यापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेने कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांना संजय पवार यांना मातोश्रीवर येण्याचे आदेश दिले आहेत.